गझल

गझल

स्थित्यंतरे

कापली नाहीत अजुनी तेवढी मी अंतरे
योजिली आहेत माझी मी निराळी अंबरे

मी भरारी घेतली अन दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन कोपरे

पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे

मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे

डाव

चेहर्‍याला झाकते ती
आत थोडे हासते ती

माळतांना हार कोरा
मोगऱ्याशी भाळते ती

संकटांशी झुंजतांना
चूक साधी  टाळ्ते ती

गारव्याची साद येता
तेज थोडे पाळते ती

हारलेला डाव माझा
जिंकतांना हारते ती

--------------------बापू दासरी,  नांदेड

 

 

 

क्षणोक्षणी....

 

राहतो जरी तुझ्या नशेत मी क्षणोक्षणी....
जाणवे तरी मला तुझी कमी क्षणोक्षणी....

अंग अंग चिंब रंग खेळलो असा गडे..
की स्मरेल हीच रंगपंचमी क्षणोक्षणी....

वाट पाहुनी अधीरता शिगेस पोचली..
मी रहायचे कितीक संयमी क्षणोक्षणी..?

बोलणे नि भेटणे कमी करून टाकले..
मंद होत चालली तुझी हमी क्षणोक्षणी....

नाटकामधील काम संपले

कुठे नेतील या वाटा मनाला....

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद

कोणती इच्छा सफल होत नाही
कुणाचा चेहरा मला दिसत नाही...

मृत्यु निश्चित एकदा आहे तरी
रात्रभर का झोप मजला येत नाही?...

हसू यायचे परिस्थितीवर पूर्वी
मी अता कशावरही हसत नाही...

मी जिथे आहे तिथे आज मजला
बातमी माझी स्वतःची मिळत नाही!...

काहि कारण गप्प मी आहे खरा
अन्यथा का बोलणे 

गुंता

आज असेही करेन म्हणतो
म्हणायचे ते म्हणेन म्हणतो

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

मर्द मराठा "जगलो मी जर -
पुन्हा तुझ्याशी लढेन" म्हणतो

तुम्ही पुरावे मागा, शोधा...
मला मीच उद्धरेन म्हणतो

कवडसा



कंकण हळुहळु टिचले रात्री
दु:ख जगाचे थकले रात्री


नवोदयाचा ध्यास उशाला
स्वप्न पांघरुन निजले रात्री


खूप डिवचुनी मला चिडवुनी
दीप अचानक विझले रात्री


मिणमिणता  आतुर कवडसा
बंध गाठिचे सुटले रात्री


कवेत घे ही गझल राजसा
अधर तुझे पुटपुटले रात्री


_____________बापू दासरी, नांदेड

 

 

 

 

 

 


 

 


 

 



 

गझल



बोल प्रेमाचे तुझ्या ओठात होते
कोण जाणे काय पण पोटात होते

माणसाला दंश करता सर्प मेला
जहर इतके मानवी रक्तात होते


रंगता मैफल मनी तव आठवांची
हुंदक्यांची भैरवी मी गात होते


जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते


साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते

असोशी....

भेटण्याची राहिली नाही असोशी...
जोडला संबंध आत्म्याचा तिच्याशी...


हाय संपत्ती कमवली एवढी की
मी सदाही ठेवतो चाकू उशाशी...!


काय अपवादा तुझा खोटा जिव्हाळा..!
जोडला संबंध तू साध्या जगाशी...!!!


मुक्त झाला देवही इतरांप्रमाणे..
ठेवले त्याने मला जेव्हा पुजेशी..!


खोल मी माझ्या मुळा मातीत नेल्या..
मग कुठे संपर्क केला मी नभाशी...



अमित वाघ."गुरूमंदिर" सुधीर कॉलनी, अकोला-४४४००१.
मोबाईल नं. :- ९८५०२३९८८२, ९९७०१६७५७२.

अजून कोणी तरी मनाशी...(जुनी)


कुणास नाही तरी मला तो दिसतो आहे
अजून कोणी तरी मनाशी वसतो आहे


मला असे भान भावनांचे.., पण हा वेडा,...
...धरून हातात इंद्रियांना हसतो आहे...!


मलाच माझ्या सुसाटतेचे भय का वाटे..?
कुठे पळावे.. किती पळावे...?..पुसतो आहे..


बटा तुझ्या आवरून घे ना, सखये, बाई...
सुगंध हा बावऱ्या मनाला डसतो आहे


कळे