कुठे म्हणालो मला चांदणे आवडते?
खरे तर मला तुझेच हसणे आवडते...
नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...
तुझा हट्ट तू सोडणार नाहीस कधी
मलाही तुझे रुसून बसणे आवडते...
तू नसताना पावसात मी भिजू कसा?
आठवणींच्या सरींत भिजणे आवडते...
एकटाच मी गातो आहे 'अजब' गजल
असे सुरांतच तुला शोधणे आवडते...